नवी दिल्ली – गेल्या काही काळापासून भारतासोबत कुरापती काढणाऱ्या चीनच्या आणखी एका कारस्थानाचा पर्दाफाश झाला आहे. चीन आणि पाकिस्तान हे दोन्ही शेजारी देश पाकव्याप्त काश्मीरमध्ये एक मिसाइल साइट अर्थात क्षेपणास्त्र साइट स्थापन करत असल्याचे उघड झाले आहे. एका भारतीय खासगी वृत्तसंस्थेने लष्करातील सूत्रांच्या हवाल्याने ही बातमी दिली आहे.
नाव उघड न करण्याच्या अटीवर लष्करातील सूत्रांनी ही माहिती दिल्याचा संबंधित वृत्तसंस्थेने दावा केला आहे. त्यानुसार व्याप्त काश्मीरमध्ये या साइटसाठी जागा शोधली जाते आहे. जमीनीवरून आकाशात मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांसाठी ही साइट असणार आहे.
गेल्या काही काळात पाकिस्तान आणि चीनच्या लष्करी अधिकाऱ्यांची भेटीगाठीही वाढल्या आहेत. त्यांचा संयुक्त अभ्यासही सुरू झाला असल्याच्या बातम्या मध्यंतरी आल्या होत्या. पाक आणि चीनच्या लष्कराच्या अधिकाऱ्यांना एकत्रितपणे पाहिले गेल्याचेही सांगितले गेले होते.
भारतीय हवाईदलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल आर के एस भदौरिया यांनीही काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत याबाबतचे संकेत दिले होते. दोन्ही देशांच्या जवळीकीवर आम्ही लक्ष ठेवून असल्याचे ते म्हणाले होते. भारताला एकाच वेळी दोन आघाड्यांवर सज्जता ठेवावी लागत असून बऱ्याच काळापासून आपण या धोक्याच्या छायेत वावरत असल्याची टीप्पणीही त्यांनी केली होती.
व्याप्त काश्मीरच्या देओरियन आणि जुरा या भागात चीन आणि पाक लष्कराच्या तुकड्यांना एकत्रितपणे पाहण्यात आले आहे. येथील लसाडना ढोकजवळच्या पाउली पीर येथे संबंधित क्षेपणास्त्र साइटच्या निर्मितीचे कारस्थान सुरू असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
या साइटचा नियंत्रण कक्ष व्याप्त काश्मीरच्या मुख्यालयात असणार आहे. तेथे तीन अधिकाऱ्यांसह दहा चीनी सैनिक तैनात केले जाणार असल्याची माहितीही मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे.