बारामती – सरकार आज आहे तर उद्या नाही, बारामतीत भाजप कार्यकर्त्यांच्या विरोधात आंदोलन केल्यानंतर पोलिसांत गुन्हे दाखल केले जात आहेत. पक्षस्तरावर याची दखल घेतली गेली आहे. याबाबत लवकरच पक्षीय पातळीवर काही तरी निर्णय होईल, अशी माहिती माजी मंत्री व भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी दिली. दरम्यान, आपण बारामतीतील भाजप कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे आहोत, अशी ग्वाही देण्यास पाटील विसरले नाहीत.
बारामती तालुक्यातील उंडवडी कडेपठार येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सवलतीच्या दरात वस्तू वाटप, सेवाकार्य पुस्तिकेचे प्रकाशन व पदाधिकारी निवड आदी उपक्रमप्रसंगी ते बोलत होते. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे उपस्थित होते.
पाटील म्हणाले की, बारामतीत भाजप कार्यकर्त्यांवर किरकोळ आंदोलन केले तरी लगेचच गुन्हे दाखल करून कार्यकर्त्यांना लक्ष्य केले जात आहे. वरिष्ठ स्तरावर पोलिसांच्या या कारवाईची माहिती देण्यात आली आहे. याबाबत पक्षस्तरावर काहीतरी निर्णय होईल, असा एक प्रकारे इशाराच पाटील यांनी याप्रसंगी दिला. केंद्राच्या माध्यमातून राज्याला भरीव निधी दिला जात आहे, त्याची माहिती जनतेपर्यंत कार्यकर्त्यांनी पोहोचवावी, पक्ष बारामतीत भाजपच्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.