पुणे/कात्रज, – महापालिकेच्या पाणीपुरवठा खात्यातील कार्यकारी अभियंत्याला शिवीगाळ आणि धक्काबुक्की केल्याच्या आरोपावरून भाजपचे माजी आमदार आणि पक्षाचे ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर यांच्यासह भाजपच्या नगरसेविका राणी भोसले यांच्या विरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली असून 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
सरकारी काम रोखणे, अधिकारी-कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करणे यासह विविध कलमांनुसार स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
टिळेकर, भोसले यांच्यासह नगरसेविका रंजना टिळेकर, ऋषाली कामठे, वीरसेन जगताप अशी अटक झालेल्या नगरसेवकांची नावे आहेत. याप्रकरणी कार्यकारी अभियंता आशिष देवप्रकाश जाधव यांनी फिर्याद दिली आहे. कात्रज-कोंढवा रस्ता, बालाजीनगर, धनकवडी परिसरात पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी टिळेकर यांनी सोमवारी पाणी पुरवठा विभागाच्या स्वारगेट येथील कार्यालयात आंदोलन केले.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, टिळेकर यांनी फिर्यादी यांच्या टेबलावरील काच फोडली आणि कार्यालयातील फाइल फेकून दिल्या. तर कार्यकर्त्यांनी कार्यालयातील खुर्च्यांचे नुकसान केले तसेच काचाही फोडल्या. त्यानंतर टिळेकर यांनी फिर्यादीच्या अंगावर धावून जात त्यांना दमदाटी केली. तसेच, ढकलत कार्यालयाबाहेर काढले. तेथे अभियंते जाधव यांना पाणी पुरवठा संदर्भात प्रश्न विचारण्यात आले, पुष्पहार घालून आरतीही करण्यात आली. सरकारी कामात अडथळा आणला. या सर्वांत कार्यालयाचे 12 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
कात्रज कोंढव्याच्या पाणी प्रश्नावर काय मार्ग काढता येईल, याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. वडगाव प्लॅंटपासून केदारेश्वरची टाकी आणि राजीव गांधी पंप हाऊस याकरिता सात झोन आहेत. या सात झोनमधील प्रत्येक दिवशी एक झोन बंद ठेवण्यात आला. त्यामुळे मागचे दीड वर्ष आठवड्यातील सहा दिवस या संपूर्ण भागाला वडगांव प्लॅंटवरून येणाऱ्या पाण्यातून योग्य पाणीपुरवठा केला आहे.
– आशिष जाधव, कार्यकारी अभियंता पाणीपुूरवठा विभाग
गेली चार महिने पाण्याचा प्रश्न गंभीर झालेला आहे. पाणी पुरवठा अधिकारी जाधव यांना भाजपच्या पाचही नगरसेवकांनी दोन वेळेस लेखी निवेदनद्वारे तक्रार दिली आहे. वर्षानुवर्षे आम्ही संघर्ष करुन प्रश्न मिटवलेला असताना वडगाव पंपिग वरून मिळणारे मुबलक पाणी कुठं पळवलं, याचं उत्तर त्यांनी द्यावं. जाधव हे अत्यंत मग्रूर अधिकारी आहेत. जाधव अधिकाऱ्यांशी मग्रूरपणे वागतात.
– योगेश टिळेकर, माजी आमदार, हडपसर