जयपुर – उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांची तुलना राजस्थानातील कॉंग्रेसने उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जोंग यांच्याशी केली आहे. राजस्थानात आज हाथरस प्रकरणात कॉंग्रेस तर्फे मुक मोर्चा आयोजित करण्यात आला होता.
त्यानंतर आयोजित सभेत बोलताना कॉंग्रेस नेत्यांनी हा आरोप केला. राजस्थान विधानसभेतील कॉंग्रेसचे प्रतोद महेश जोशी म्हणले की योगी यांची सारी वर्तणुक उत्तर कोरियाच्या हुकुमशहा सारखीच आहे.
त्यांनी पीडित मुलीचा मृतदेह रात्रीत जाळून टाकला आणि पीडित परिवाराला पुर्ण दहशतीखाली ठेवले. असा प्रकार देशात पुर्वी कधी झाला नव्हता. उत्तर कोरियात किम जोंग जे करीत आहे ते पाहूनच योगी तशा प्रकारचा कारभार उत्तरप्रदेशात करीत आहेत असा आरोपही जोशी यांनी केला.
उत्तरप्रदेशचे पोलिस ज्या प्रकारची वर्तणुक करीत आहेत ते पाहून त्यांच्याकडून कोणतीही अपेक्षा करता येणार नाही असे ते म्हणाले. या सभेत कॉंग्रेसच्या अनेक नेत्यांनी भाजपच्या एकूणच राजवटीवर तुफानी टीका केली.
दरम्यान आज भाजपच्या नेत्यांनीही राजस्थानातील महिला अत्याचारांच्या विरोधात येथे मोर्चा काढला होता, त्याचा संदर्भ देत कॉंग्रेस नेते जोशी म्हणाले की हाथरस प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर भाजपला असा मोर्चा काढण्याचा नैतिक अधिकार उरलेला नाही.
भाजपच्या नेत्यांनी राजस्थानात मोर्चा काढण्यापेक्षा योगी सरकारच्या विरोधातच मोर्चा काढायला हवा होता असे ते म्हणाले.