लोणी धामणी (पुणे) – आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील धामणी, पहाडदरा, शिरदाळे येथे शनिवारी (दि. 19) ढगफुटीसदृश झालेल्या पावसाने या परिसराला चांगलेच झोडपले. मोठ्या प्रमाणात आलेल्या पुरामुळे येथील ओढ्याच्या पाणी पातळीत प्रमाणापेक्षा जास्त वाढ झाल्याने ओढ्याकाठच्या दोन्ही बाजूच्या कुटुंबांना सतर्क राहण्याचे आवाहन सरपंच सागर जाधव यांनी केले.
धामणी, पहाडदारा (ता. आंबेगाव) परिसरात आज (दि. 19) दुपारी दोनच्या सुमारास एक-दीड तास मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे येथील ओढ्या-नाल्यांना मोठा पूर आला. मात्र, या परिसरातील शेतीचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. या भागात पाणलोटची कामे मोठ्या प्रमाणावर झाली असून, आता झालेल्या पावसाने येथील) सर्व बंधारे तुडुंब भरून वाहत आहेत.
आज दुपारी अचानक आलेल्या धुवाधार पावसाने शेतकऱ्यांची चांगलीच धावपळ झाली. शेतात असणारी बाजरीच्या कणसे, भुईमूग आणि इतर तरकारी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या भागात सध्या ढगाळ वातावरणाने हवेत चांगला उकाडा वाढला असून, येत्या काही दिवसांत पाऊस असाच जोरदार हजेरी लावेल असा अंदाज आहे. सध्या होणाऱ्या या पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याने परिसरातील शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे.