पुणे – ऑनलाइन परीक्षा घेताना ग्रामीण भागात इंटरनेटची अडचण आहे. काही विद्यार्थ्यांकडे मोबाइल, टॅब, लॅपटॉप उपलब्ध नाहीत. राज्याच्या ग्रामीण भागात अनेक प्रवेशित विद्यार्थी आहेत. त्यांना ऑनलाइन परीक्षा शक्य झाली नाही, तर कशा पद्धतीने परीक्षा घ्यायच्या, अशा अनेक तक्रारींचा पाढा ग्रामीण भागातील महाविद्यालयांतील प्राचार्यांनी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्याबरोबर झालेल्या ऑनलाइन बैठकीत वाचला.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. करमळकर यांनी आज संलग्नित महाविद्यालयाच्या प्राचार्यांशी ऑनलाइन बैठक घेतली. त्यात पुढील महिन्यात अंतिम वर्ष विद्यार्थ्यांची परीक्षा होत आहे. त्याबाबत महाविद्यालयांना ऑनलाइन परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करावे, असे आवाहन केले. महाविद्यालयाच्या अडचणी सोडवण्यासाठी सहकार्य केले जातील, अशी ग्वाहीही कुलगुरूंनी यावेळी दिली.
पुणे विद्यापीठाने अंतिम वर्षाची परीक्षा “एमसीक्यू’ अर्थात मल्टिपल चॉइस क्वेश्चन्स पद्धतीने ऑनलाइन व ऑफलाइन परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. बहुतांश विद्यार्थ्यांनी ऑनलाइन परीक्षा द्यावी अशी विद्यापीठाची भूमिका आहे. त्यासंदर्भात विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांच्या प्राचार्यांची बैठक घेण्यात आली. यात ग्रामीण भागातील प्राचार्यांनी ऑनलाइन परीक्षा घेताना येणाऱ्या अडचणी मांडल्या. त्या शंकाचे कुलगुरूंनी निरसन केले. दरम्यान, विद्यार्थ्यांना परीक्षा ऑनलाइन की ऑफलाइन अशा दोन पर्याय निवडण्यासाठी दि.13 सप्टेंबरपर्यंत संधी देण्यात आली आहे. त्यावेळी विद्यार्थ्यांनी ऑनलाइनच पर्याय निवडावा, यासाठी त्यांच्यात जागृती करावी. “एमसीक्यू’ परीक्षेपूर्वी त्यांना सराव परीक्षा करण्यासाठी संधी दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
अंध विद्यार्थ्यांसाठी सुविधा काय?
महाविद्यालयांमध्ये काही अंध विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. त्यांना ऑनलाइन परीक्षा देणे शक्य नाही, अशी अडचणी काही प्राचार्यांनी मांडली. या विद्यार्थ्यांसाठी “स्पीक टू टेक्स्ट’ची सुविधा सॉफ्टवेअरवर दिल्यास ते परीक्षा देऊ शकतील. त्याबाबतही विचार केला जाणार असल्याचे विद्यापीठाकडून स्पष्ट करण्यात आले.