फलटणला उभारणार कोविड केअर सेंटर; ऑक्सिजनसह 40 बेड उपलब्ध होणार
कोळकी (वार्ताहर) – समाजाच्या मागण्यांसाठी अभूतपूर्व मोर्चा उभा करणारा मराठा समाज करोनाच्या आपत्ती काळातही धावून येत आहे. फलटण येथे वाढलेला करोनाचा प्रादुर्भाव, ऑक्सिजन बेडअभावी होणारे मृत्यू रोखण्यासाठी येथील मराठा क्रांती मोर्चा पुढे आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज कोव्हिड केअर सेंटर उभारून त्यामध्ये ऑक्सिजनचे 40 बेडस् उपलब्ध करून दिले जाणार आहेत. मदतीचा हात पुढे करून मराठा क्रांती मोर्चा आपल्या मराठा समाजासह इतर समाजाची आरोग्य संपदा जपणार आहे.
फलटण शहर व तालुक्यातील अनेक गावात करोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या वाढत्या रुग्णांना रुग्णालयात बेडस् उपलब्ध होत नसल्याने मराठा क्रांती मोर्चा फलटणच्या वतीने सर्व सोयींनीयुक्त व ऑक्सिजन युनिटसह ताबडतोब 20 व टप्प्याटप्प्याने अजून 20 असे एकूण 40 बेडस् उपलब्ध होणार असून यासाठी सर्व समन्वयक व मार्गदर्शकांनी एकत्र येत मदत केली आहे. या मदतीमधून सर्व समाजातील लोकांना या रुग्णालयात उपचारासाठी मदतीचा हात पुढे केला जाणार आहे. त्याचबरोबर या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात डॉक्टरांसह इतर सर्व सोयी उपलब्ध होणार आहेत.
समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे येत आर्थिक मदत करावी, असे आवाहन प्रांताधिकारी डॉ. शिवाजी जगताप, तहसीलदार आर. सी. पाटील, मुख्याधिकारी प्रसाद काटकर व पोलीस उपअधीक्षक तानाजी बरडे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत मराठा क्रांती मोर्चा फलटण यांनी पुढे येत सद्यस्थितीत शहर व तालुक्यातील लोकांसाठी “एक हात मदतीचा’ यासाठी मराठा क्रांती मोर्चाची बैठक आयोजित केली.
करोना रुग्णांना येणाऱ्या अनेक अडचणी सोडवण्यासाठी प्रशासनाला व लोकांना मदत करायची असा ठराव सर्वानुमते करीत लगेचच या बैठकीत निर्णय घेण्यात आला. हे रुग्णालय उभे करण्यासाठी शाळा देण्याचे सदगुरू व महाराजा उद्योग समुहाचे संस्थापक-अध्यक्ष दिलीपसिंह भोसले यांनी जाहीर केले. त्या ठिकाणची स्वच्छता, पिण्याचे पाणी व इतर लागणाऱ्या सर्व सुविधा देण्याचे आश्वासन दिले. या रुग्णालयात डॉक्टर, नर्स व इतर कर्मचारी उपलब्ध करून देणार असल्याचे तहसीलदार पाटील यांनी सांगितले.
येत्या दोन- तीन दिवसात येथे बेडस्, ऑक्सिजन व इतर सामग्रीसाठी सर्वांनी आर्थिक मदत दिली. तातडीने 20 बेडस् उपलब्ध करण्याचे ठरले. प्रभारी तहसीलदार आर. सी. पाटील यांच्याबरोबर सर्व चर्चा केली. हे 20 बेडस्चे रुग्णालय उभारल्यानंतर येत्या आठ दिवसांत अधिकचे 20 बेडस् ऑक्सिजनसह उभारण्यात येणार आहेत, असे क्रांती मोर्चाकडून सांगण्यात आले आहे. इतर सामाजिक, शैक्षणिक, राजकीय व इतर क्षेत्रांतील लोकांनीही कोविड रुग्णालय उभारण्यासाठी आर्थिक मदत करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.