पुणे – राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील परिस्थितीवर मॅरेथॉन बैठका घेताना स्वपक्षीय कार्यकर्त्यांनाही “ग्राऊंड लेव्हल’ला उतरून नागरिकांची मदत करण्याची,हाक दिली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते कामाला लागले असून येत्या दोन दिवसांत राष्ट्रवादी कॉंगेसच्या उपाययोजनांचा डॅशींग बोर्ड’ नागरिकांसाठी उपलब्ध करून दिला जाणार आहे.
पुण्यातील स्थितीवर शरद पवार आणि अजित पवार हे लक्ष ठेऊन आहेत. प्रशासनातील समन्वयाचा अभाव, कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेल्या जम्बो कोविड हॉस्पिटलविषयी नाराजी, त्यातून मिळणारे निगेटिव्ह रिपोर्ट या सगळ्या परिस्थितीचा त्यांनी शनिवारी आढावा घेतला. प्रशासनावरच पूर्णपणे अवलंबून न राहता त्यांनी स्वत:च्या पक्षातील कार्यकर्त्यांची “ब्रिग्रेड’ आता या उपाययोजनेसाठी मैदानात उतरवली आहे.
आठही मतदार संघामध्ये नागरिकांसाठी हेल्पलाइन सुरू करणे, नागरिकांना धीर देणे, हॉस्पिटलची अद्ययावत माहिती देण्याचे व्यवस्था करणे, हॉस्पिटल्सशी संपर्क साधून रुग्णांना दाखल करून घेणे याबाबत मदत करावी, असे पवार यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांना सांगितले होते. त्यानुसार आता बेवसाइट बनवणे आणि त्याद्वारे अद्ययावत माहिती, दूरध्वनीक्रमांक वगैरे असलेला डॅश बोर्ड नव्हे तर “डॅशींग बोर्ड’च तयार करण्यात येणार आहे.