श्रीगोंद्यातील बेलवंडी पोलिसांमुळे झाली भेट : गव्हाणेवाडीतील ग्रामस्थांचेही सहकार्य शिरूर (पुणे) -शिरूरजवळ श्रीगोंदा तालुक्यातील गव्हाणेवाडी येथे एका बेवारस वयोवृद्ध व्यक्तीला त्याची माहिती घेऊन बेलवंडी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी थेट शेवगाव तालुक्यात त्यांच्या मुलीच्या घरी नेऊन सोडले. त्यामुळे तब्बल दहा वर्षानंतरच्या अचानकपणे झालेल्या बाप-लेकीच्या हृदयद्रावक भेटीने डोळ्यांत पाणी येत खाकी वर्दीही गहिवरली. गव्हाणेवाडी येथील वीटभट्टीचे मालक रावसाहेब सोनुळे यांना गव्हाणेवाडीच्या वळणावर एक 65 ते 70 वर्षीय वयोवृद्ध व्यक्ती रस्त्याच्या कडेला पडलेली दिसली. करोनामुळे लांबूनच त्यांनी प्रथमतः त्या वृद्धाची विचारपूस करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोटात काहीच नसल्याने ती व्यक्ती काहीच बोलली नाही. त्यामुळे सोनुळे यांनी त्या व्यक्तीला नाश्ता व पाण्याची बाटली आणून दिली. खाल्ल्यानंतर त्या व्यक्तीने खूप लांबून पायी आल्याने आता चालता येत नसल्याचे सांगितले. त्यानंतर सोनुळे यांनी या भागातील पत्रकार दीपक वाघमारे यांना याविषयी कल्पना दिली. वाघमारे यांनी लागलीच बेलवंडी पोलीस ठाण्याचे हवालदार रावसाहेब शिंदे यांना माहिती दिली. शिंदे यांच्यासह हवालदार नामदेव शेलार यांनी ठिकाणी पोहचत त्या वयोवृद्ध व्यक्तीची भेट घेतली. करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कुणीही त्या व्यक्तीजवळ जात नव्हते; मात्र हवालदार शिंदे यांनी स्वत:ची काळजी घेत स्थानिकांच्या मदतीने त्याला उठवले. त्याची चौकशी केली असता त्याने देविदास किसन पोपरे असे नाव सांगून बाग पिंपळगाव (ता. गेवराई, जि. बीड) येथील रहिवासी असल्याचे सांगितले. तसेच इथून गाव लांब असून माझी मुलगी गंगूबाई ज्ञानेश्वर साखळे ही रानेगाव शिंगोरी (ता. शेवगाव) येथे म्हणजे त्यापेक्षाही अलीकडे रहात असल्याने मला मुलीकडेच सोडा, असे सांगितले. गव्हाणेवाडीचे ग्रामपंचायत सदस्य पंकज चव्हाण यांनी त्या वृद्धाला त्याच्या घरी सोडविण्यासाठी ग्रामस्थांच्या आर्थिक मदतीने खासगी वाहनाची व्यवस्था केली. रात्री एकच्या दरम्यान मुलीच्या गावी पोहचले. मुलगी झोपेतून उठताच तब्बल दहा वर्षांपूर्वी घर सोडून गेलेले वडील अचानक समोर दिसताच मुलीने बाबा… म्हणत हंबरडा फोडला. मुलीला कडकडून भेटताना त्या वृद्धानेही आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. बराच वेळ दोघांच्याही तोंडून शब्द फुटत नव्हते; मात्र अश्रू अनावर झाले होते. या हृदयद्रावक प्रसंगाने एरवी गुन्हेगारासमोर कठोर वागणाऱ्या खाकी वर्दितील पोलिसालाही गहिवरून आले अन् नकळत त्यांच्या डोळ्याच्या कडा पान्हावल्या. यावेळी दहा वर्षांपूर्वी बाबा घर सोडून गेल्याने नातेवाईकांनी त्यांचा खूप शोध घेऊनही ते सापडले नाहीत; मात्र अजूनही त्यांची आठवण मनामधे ताजी होती. अखेर दहा वर्षांनी बेलवंडी पोलिसांनी आम्हा बाप लेकींची भेट घडवून आणली. त्याबद्दल त्यांचे आभारी असल्याचे मत संबंधित बाबाची मुलगी गंगुबाई साखळे यांनी व्यक्त केले. पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार शिंदे यांनी ही भेट घडवून आणल्याने परीसरातून त्यांचे विशेष कौतुक होत आहे.