ढाका – ढाक्याजवळच्या मशिदीमध्ये एअर कंडिशनच्या स्फोटात मरण पावलेल्यांची संख्या 24 वर पोहोचली आहे. शनिवारी रात्रीपर्यंत मृतांचा आकडा 21 पर्यंत पोहोचला होता. तर या स्फोटात जखमी झालेल्यांपैकी आणखी तिघाजणांचा उपचारादरम्यान आज मृत्यू झाला, असे डॉक्टरांनी सांगितले. अजूनही 13 जणांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर ‘शेख हसिना नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ बर्न ऍन्ड प्लॅस्टिक सर्जरी’मध्ये उपचार सुरू आहे, असे डॉक्टरांनी सांगितले.
ही दुर्घटना भूमिगत गॅसच्या पाईपलाईनमधून गॅस गळतीमुळे मशिदीतील सर्वच्या सर्व एसीचा एकाचवेळी स्फोट झाला होता. शुक्रवारी संध्याकाळची प्रार्थना संपण्याच्यावेळी हा स्फोट झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली होती. नारायणगंज या मध्य जिल्ह्यातील बैतुल सलात मशिदीमध्ये ही दुर्घटना घडली होती.
या भूमिगत पाईप लाईनमधून गॅस गळती होत असल्याची तक्रार संबंधित मशिदीच्या प्रशासनाने अलिकडेच केली होती. मात्र या पाईपलाईनच्या दुरुस्तीसाठी टिटॅस गॅसच्या संबंधित अधिकाऱ्यांनी 50 हजार टका लाच मागितली होती. ही लाच दिली गेली नव्हती म्हणून या तक्रारीकडे दुर्लक्ष करण्यात आले होते, असे बांगलादेशातील वर्तमानपत्राने म्हटले आहे.
पंतप्रधान शेख हसिना यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून देशातील सर्व मशिदींच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.