पुणे – मौजमजेसाठी दुचाकी वाहने चोरी करणाऱ्या तिघांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. त्यांच्या ताब्यातून 4 लाख 40 हजारांच्या चोरीच्या 16 दुचाकी जप्त केल्या. सचिन हनुमंत थोरात (वय 29, रा. फुरसुंगी, मुळ- आंतरगाव, उस्मानाबाद), इर्शाद युनिस पठाण (वय 32, रा. आकुर्डीगाव), श्रावण ऊर्फ महेश वसंत साबळे (वय 24, रा. कुंजीरवाडी, ता. हवेली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
वाहनचोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध घालण्यासाठी गुन्हे शाखा युनिट पाचकडून आरोपींचा माग काढला जात होता. त्यावेळी सापळा रचून आरोपींना अटक केली. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली.
त्यावेळी त्यांनी पुणे शहर, ग्रामीण, सोलापूर ग्रामीण, सोलापूर व इतर जिल्ह्यांतून मौजमजेसाठी दुचाकी वाहने चोरल्याचे समोर आले. त्यांच्याकडून शहरातील वाहनचोरीचे नऊ गुन्हे, पुणे ग्रामीण तीन गुन्हे, सोलापूर ग्रामीण व पिंपरी-चिंचवड येथील वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आले.