पुणे – लक्ष्मी रस्त्यावर एका सराफाला धमकावून चोरट्यांनी त्याच्याकडील सोन्याचे कडे, साखळी तसेच रोकड असा 2 लाख 80 हजार रुपयांचा ऐवज लुटला. दोन दिवसांपूर्वी स्वारगेट येथील पीएमपी स्थानक परिसरात एका युवकाचा खून करण्यात आला. चोरट्याने युवकाकडील मोबाइल संच आणि रोकड हिसकावली होती. गणेशोत्सवात सेवानिवृत्त पोलिसावर तीक्ष्ण शस्त्राने वार करून चोरट्यांनी त्याच्याकडील मोबाइल संच हिसकावून नेला होता.
याबाबत जितेंद्र राठोड (30, रा. नरवीर तानाजीवाडी, शिवाजीनगर) याने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दुचाकीस्वार तीन चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल झाला. राठोड यांचे शिवाजीनगर येथे सराफी दुकान आहे.
दोन दिवसांपूर्वी राठोड यांना मध्यरात्री चहा प्यायचा होता. मध्यभागात चहा विक्रीचे दुकान सुरू असल्याची शक्यता वाटल्याने राठोड दुचाकीवरून मध्यभागात आले. रात्री साडेबाराच्या सुमारास लक्ष्मी रस्त्यावर बॅंक ऑफ बडोदासमोर दुचाकीवरून आलेल्या तीन चोरट्यांनी राठोड यांना अडवले. एकाने चोरट्याने या भागात काय काम आहे, अशी विचारणा केली. त्यानंतर चोरट्याबरोबर असलेल्या साथीदाराने राठोड यांना धमकावण्यास सुरुवात केली.
राठोड यांच्या हातातील सोन्याचे कडे, सोनसाखळी, अडीच हजारांची रोकड असलेले पाकिट असा ऐवज लुटून चोरटे दुचाकीवरून पसार झाले. सहायक पोलीस निरीक्षक युवराज पाटील तपास करत आहेत.