मंचर, घोडेगावात 400 जणांकडून 85 हजार 500 रुपये वसूल
मंचर (पुणे) – करोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी मंचर आणि घोडेगाव पोलिसांनी 400 व्यक्तींवर कारवाई करून 85 हजार 500 रुपये दंड वसूल केला. तसेच ही कारवाई यापुढेही सुरू राहिल, अशी माहिती मंचर ठाण्याचे पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे, घोडेगाव ठाण्याचे सहायक निरीक्षक प्रदीप पवार यांनी दिली.
मंचर पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या 6 पोलीस बीट, मंचर शहर आणि पुणे-नाशिक महामार्ग या परिसरातील सोशल डिस्टन्सचे पालन न करणाऱ्या तसेच विनामास्क फिरणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करून 61 हजार 600 रुपये दंड वसूल करण्यात आला. तर घोडेगाव पोलिसांनी केलेल्या कारवाईत 23 हजार 900 रुपये दंड नागरिकांकडून वसूल करण्यात आला आहे. यामध्ये सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणे व मास्क न लावणाऱ्या 93 जणांकडून 22 हजार 500, 7 वाहनचालकांवर कारवाई करत 1 हजार 400 असा एकूण 23 हजार 900 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तर 100 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंचर पोलीस ठाण्याअंतर्गत बीटनुसार कारवाई (रुपयांत)
बीट नागरिकांवर कारवाई वसूल दंड
पारगाव 19 4 हजार 300
लोणी 23 4 हजार 700
अवसरी 29 5 हजार 100
रांजणी 10 2 हजार
लांडेवाडी 22 4 हजार 400
पेठ 57 7 हजार 200
मंचर 27 7 हजार 800
पुणे-नाशिक रस्त्यावर 120 27 हजार 600
एकूण 307 63 हजार100