पिरंगुट -बलात्काराच्या गुन्हा करून वीस दिवस फरार असलेल्या दोन आरोपींना पौड पोलिसांनी पाठलाग करून पकडले. एक आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला बाल न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे.
पौड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आंदगाव येथील मुलीला पळवून नेऊन माळेगाव येथील डोंगरावर जाऊन लैंगिक अत्याचार करून ते फरार झाले होते. या तपासासाठी महिला पोलिस उपनिरीक्षक रेखा दुधभाते माळेगाव येथे गेल्या असता आरोपी रायगड येथे गेल्याची खोटी माहिती मिळत होती. आरोपी गावातच असल्याची माहिती महिला पोलीस दूधभाते यांना मिळाली.
त्यानुसार हवेलीच्या उपविभागीय पोलीस अधिकारी सई भोरे पाटील व वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रेखा दुधभाते, पोलीस हवालदार अब्दुल शेख, संजय राक्षे, संतोष कुंभार, पोलीस नाईक शेखर हगवणे, पोलीस शिपाई नामदेव मोरे, सुहास सातपुते, प्रशांत बुणगे यांचे पथक आरोपीला अटक करण्यासाठी गेले. मात्र, पोलिसांचा सुगावा लागताच आरोपी माळेगाव डोंगरात पळाले. पोलिसांनी पाठलाग करून अटक केली.