डब्ल्युएचओने दिला इशारा
जीनिव्हा – मार्च महिन्यापासून जगभरात पसरलेल्या करोना विषाणूचे नवे रूप पुढे आले आहे. आता हा विषाणू अधिक आक्रमक झाला असून त्याच्या फैलावाचा वेग पूर्वीच्या तुलनेत दहापट जास्त वाढला आहे, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्युएचओ) दिला आहे.
करोनाच्या विषाणूने नवा अवतार धारण केला असून त्याचा संसर्ग आता पूर्वीपेक्षा दहापट जास्त वेगवान झाला आहे. या नव्या स्वरूपातील करोनाची बाधा वेगाने होत असल्याचे मलेशिया, फिलीपीन्स तसेच अन्य आशियाई देशांतही दिसून येत आहे. त्यामुळे येत्या काळात जागतिक स्तरावर योग्य ती काळजी नागरिकांनी घेतली नाही तर त्याचा फैलाव अत्यंत वेगाने होऊ शकतो व त्यामुळे पहिल्यापेक्षाही जास्त नुकसान होऊ शकते, असेही संघटनेने म्हटले आहे.
करोनाच्या या नव्या रूपामुळे जगाला अत्यंत भयानक परिणामांना सामोरे जावे लागेल. आता जगभरात यावर उपाय शोधण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र, येत्या काळात नागरिकांनी सोशल डीस्टन्सिंगचे पालन करणे तसेच मास्कचा वापर करणे सातत्याने सुरू ठेवले पाहिजे तरच आपण यावर नियंत्रण ठेवू शकतो. हा विषाणू या देशांसह अमेरिका व युरोपातीलही काही देशांमध्येही वेगाने पसरत आहे त्यामुळे अत्यंत सावधगीरी बाळगणे आवश्यक आहे, असेही संघटनेने सांगितले आहे.