दररोज दहा लाख चाचण्या घेण्याचे लक्ष्य
नवी दिल्ली – देशाने 3 कोटी करोना चाचण्या करत नवा टप्पा पार केला आहे. निदानासाठीच्या प्रयोग शाळांच्या जाळ्याचा विस्तार आणि देशभरात या चाचण्या सहज उपलब्ध होण्याची सुविधा यामुळे चाचण्यांची संख्या वाढण्यासाठी मोठी चालना मिळाली आहे. गेल्या 24 तासांत 7 लाख 31 हजार 697 चाचण्या करत, दररोज दहा लाख चाचण्या करण्याच्या दिशेने देशाची वाटचाल सुरू आहे. याच्या बळावर दहा लाख लोकांमध्ये 21,769 चाचण्या करण्यात येत आहेत.
14 जुलैला एकूण चाचण्या 1.2 कोटी होत्या त्यात वाढ होऊन 16 ऑगस्टला ही संख्या 3 कोटी झाली. याच काळात पॉझिटीव्हिटी दर 7.5 टक्क्यांवरून 8.81 टक्के झाला. चाचण्यांच्या संख्येत वाढ केल्यानंतर सुरवातीला पॉझिटीव्हिटी दरात सुरवातीला वाढ होईल. मात्र तत्पर विलगीकरण, शोध आणि वेळेवर वैद्यकीय उपचारांमुळे हळू हळू या पॉझिटीव्हिटी दरात दिल्लीप्रमाणे घट होऊ लागते.
जानेवारीच्या सुरवातीला पुण्यात केवळ एक प्रयोगशाळा होती आता देशात प्रयोग शाळांची संख्या 1,470 झाली आहे. यामध्ये सरकारी क्षेत्रातल्या 969 तर खाजगी 501 प्रयोग शाळांचा समावेश आहे.
कोविड-19चे रुग्ण बरे होण्याच्या दरात निरंतर वृद्धी होत आहे. आज, गेल्या 24 तासात देशात कोविड-19चे सर्वाधिक 57,584 रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.
देशातील कोविड-19 च्या बरे होणाऱ्या रुग्णांचा आकडा जवळपास 20 लाखापर्यंत पोहोचला आहे. बरे होणारे रुग्ण आणि सक्रीय रुग्णांमध्ये आज 12 लाख 42 हजारपेक्षा अधिक फरक आहे. देशातील सक्रीय रुग्णांचा आकडा 6 लाख 76 हजारांपर्यंत कमी झाला असून सध्याच्या कोविड बाधित रुग्णांच्या केवळ 25.57 टक्के इतकाच आहे.