बाधितांची संख्या पोहोचली 895 वर
कंटेनमेंट झोनची दीडशेकडे वाटचाल
सातारा (प्रतिनिधी) – सातारा तालुक्यात करोना बाधितांची संख्या 895 च्या घरात पोहोचली असून 146 कंटेनमेंट झोन निर्माण झाले आहेत. बाधितांपैकी 464 रुग्ण उपचार घेऊन घरी परतले असून रुग्णांचा रिकव्हरी रेट 53 टक्क्यांवर पोहोचला आहे. दरम्यान काल रात्री जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेल्या अहवालानुसार सातारा तालुक्यात बारा व सातारा शहरात आठ असे वीस रुग्ण नव्याने आढळून आले आहेत.
नागठाणे नजीकच्या सोनापूर गावात तीन पुरुष व तीन महिला करोना बाधित आढळल्याने आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. चिंचणेर निंब येथे एक महिला, परखंदवाडी येथे एक पुरुष, कोपर्डे येथे एक पुरुष, विकासनगर येथे एक पुरुष, देगाव फाटा येथे एक पुरूष, सोनगाव येथे एक पुरुष असे बारा रुग्ण आढळून आले आहेत.सातारा शहरात मंगळवार पेठ येथे एक महिला एक पुरूष, सदर बझार येथे एक पुरुष, गोडोली येथ दोन पुरुष एक युवती, सदरबझार येथे एक महिला, माची पेठ येथे एक पुरुष असे आठ रुग्ण नव्याने आढळून आले.
डॉ. दादासो पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार 210 गावांपैकी 100 गावांमध्ये करोनाचे संक्रमण झाले आहे. 146 कंटेन्मेंट झोनमधून 895 रुग्ण बाधित आढळून आले आहेत, पैकी 464 जणांनी करोनावर यशस्वी मात केली. मात्र सातारा पंचायत समिती आरोग्य यंत्रणेच्या संदर्भानुसार किडगाव, वळसे, अतित, खेड ग्रामपंचायत हद्दीत सत्यमनगर, जय मल्हार हौ. सोसायटी येथे पाच स्वतंत्र कंटेनमेंट झोन टाकण्यात आले. सातारा पंचायत समितीची आरोग्य यंत्रणा व जिल्हा माहिती कार्यालयाकडून प्राप्त रुग्णांची यादी यामध्ये प्रचंड तफावत आढळून आली. खाजगी लॅबच्या अहवालामध्ये संगमनगर येथे एक पुरुष बाधित आढळून आला आहे.