पुणे – यंदा जुलै महिना संपला तरी पावसाची प्रतीक्षा कायम आहे. मात्र, मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात देशभरात सरासरी 104 टक्के पाऊस बरसणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दर्शविला आहे. यामुळे पावसाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
दरवर्षी जून, जुलै महिन्यात अनेक भागांत जोरदार पाऊस हजेरी लावतो; परंतु मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कमी प्रमाणात पाऊस झाल्याने काहीसे चिंतेचे वातावरण होते. इतकेच नव्हे तर, साधारण 15 ऑगस्टनंतरच अधिक पाऊस होणार असल्याची शक्यता यापूर्वी हवामान विभागाने वर्तविली होती.
तर शुक्रवारी जाहीर केलेल्या अहवालानुसार, ऑगस्टच्या दरम्यान सुमारे 97 टक्के पाऊस बरसण्याची शक्यता आहे. तर जून ते सप्टेंबर या कालावधीत सामान्यत: सरासरी 96 ते 104 टक्के पावसाची शक्यता वर्तवली आहे. “एमएससीएफएस’वर आधारित अंदाजानुसार मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात (ऑगस्ट ते सप्टेंबर) सरासरी अंदाजापेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे.