केंदूर (प्रतिनिधी) – करंदी (ता. शिरूर) येथील एका जेष्ठ नागरिकाला करोनाची बाधा झाली होती. त्यानंतर त्यांच्यावर चाकण नंतर पिंपरी येथे उपचार सुरू होते. मात्र आज सकाळच्या सुमारास या करोना बाधित रुग्णाची मृत्यशी झुंज अपयशी ठरली. त्यामुळे करंदी परिसरात शोककळा पसरली आहे.
करंदीत गेल्या आठवड्यात करोनाचा शिरकाव झाला होता त्यानंतर हळू हळू रुग्ण संख्या वाढली आणि करंदीचा कोरोना बधितांचा आकडा थेट सातवर पोहचला. त्यानंतर प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी गावाला भेट देऊन संपूर्ण गाव लॉकडाऊन करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर शनिवारपासून (दि. १८) संपूर्ण गाव लॉकडाऊन आहे गावात येणारे सर्व मुख्य रस्ते प्रशासनाने बंद केले आहेत.
दरम्यान, इतर सहा करोना बाधित रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. मात्र एका जेष्ठ व्यक्तीला करोनाची लागण झाली होती त्यानंतर त्यांच्यावर चाकण येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी दोन दिवसांपूर्वी पिंपरी चिंचवड शहरातील एका दवाखान्यात दाखल करून उपचार सुरू केले होते.
त्या जेष्ठ नागरिकाची आज सकाळी मृत्यशी झुंज अपयशी ठरली आहे. मृत व्यक्ती यापूर्वी सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असल्याने करंदी परिसरात शोककळा पसरली आहे. दरम्यान या व्यक्तीला इतरही छोटे आजार असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले.
करंदी गाव संपूर्ण लॉकडाऊन आहे तरी देखील काही नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरत आहेत. मार्केटयार्ड परिसरात लोक गर्दी करत आहेत ग्रामपंचायत प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना करूनही नागरिक त्याठिकाणी गर्दी करत असल्याने लॉकडाऊनच्या नियमांचे नागरिक उल्लंघन करताना पाहायला मिळत आहेत.