नगर -गाईच्या दुधाला 10 रुपये लिटर अनुदान व दूध पावडरला प्रतिकिलो 50 रुपये अनुदान देण्याच्या मागणीसाठी दि. 1 ऑगस्ट रोजी भाजपच्यावतीने राज्यव्यापी दूध संकलन बंद आंदोलन करण्यात येणार असल्याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना देण्यात येऊन त्यांच्याशी चर्चा करण्यात आली.
याप्रसंगी भाजप प्रदेश उपाध्यक्ष माजी मंत्री राम शिंदे, जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, आ. बबनराव पाचपुते, माजी आ. शिवाजीराव कर्डिले, माजी जिल्हाध्यक्ष प्रा.भानुदास बेरड, बाळासाहेब महाडिक, रमेश पिंपळे, दादा बोठे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दुधाचे बाजारभाव कमी झाल्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था अतिशय दयनिय झाली आहे. महाराष्ट्रात 150 लाख लिटर गाईचे दूध उत्पादित होते. गाईच्या दुधाला प्रतिलिटर 10 रुपये अनुदान व दूध भुकटी करीता प्रती किलो 50 रुपये अनुदान तात्काळ मिळावे.
शासनाकडून 30 रुपये लिटरने खरेदी व्हावी. तसेच युरिया खताचा तुटवडा असल्यामुळे खत विक्रीमध्ये मोठ्या प्रमाणात काळा बाजार होत आहे. शेतकऱ्यांना खते मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तात्काळ युरिया उपलब्ध करावा. वीज वितरण कंपनीने सर्व ग्राहकांना भरमसाठ वीज बिल आकारुन दिले आहेत. शेतकरी व इतर ग्राहकांना विजेचे बिल माफ करावे.
तसेच ट्रान्सफारमर तात्काळ उपलब्ध करुन द्यावेत, यासर्व न्याय मागण्यासाठी आम्ही अहमदनगर जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधव 1 ऑगस्ट 2020 रोजी दूध संकलन बंद आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालय व तहसीलदार कार्यालय या ठिकाणी करणार आहोत. तरी आमचे मागण्याचे निवेदन शासनाला तात्काळ पाठवावे, अशी विनंती करण्यात आली आहे.