बारामती : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून होत नाही. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या समन्वय नसल्याच्या तक्रारीचा पाढा ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर वाचला.
त्यानंतर समन्वय ठेवता येत नसेल तर वेगळा विचार करावा लागेल अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना सुनावले. पोलीस प्रशासनानंतर वैद्यकीय क्षेत्रातील अधिकाऱ्यांची कानउघडणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज शहरातील पाटबंधारे विभागाच्या विश्रामगृहात प्रशासकीय व वैद्यकीय अधिकारी यांची आढावा बैठक घेतली. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव असताना देखील वैद्यकीय सेवेत तत्परता नसल्याने आढावा बैठकीत नाराजीचा सूर उमटला.
ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांनी उपमुख्यमंत्री यांनी केलेल्या सूचनांचे पालन वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून होत नसल्याची तक्रार अजित पवार यांच्याकडे केली. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. समन्वय ठेवता येत नसेल तर मला वेगळा विचार करावा लागेल असा सूचक इशारा अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना दिला.
यापूर्वी बारामती शहर व तालुक्यातील अवैध धंद्याबाबत अजित पवार यांनी पोलीस प्रशासनाची कानउघडणी केली होती. त्यानंतर शहर व तालुक्यात पोलिस प्रशासन हालले. वैद्यकीय अधिकाऱ्यांना देखील अजित पवार यांनी आढावा बैठकीत बूस्टर डोस दिल्याने वैद्यकीय अधिकारी देखील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समन्वय ठेवून कामकाज करतील अशी अपेक्षा बारामतीकर करत आहेत.