जुन्नर -जुन्नर तालुक्यातील आर्वी-पिंपळगाव येथील करोनाबाधिताचा उपचार सुरू असताना पुण्यात शुक्रवारी (दि. 3) सायंकाळी मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे तालुक्यातील मृतांची संख्या तीन झाली आहे. तर एकूण 83 रुग्णांपैकी 45 बरे झाले असून 35 जणांची करोनाशी झुंज सुरू आहे.
या मृत व्यक्तीचा पुतण्या आंबेगाव तालुक्यात कामास असून त्याचा करोना तपासणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्याच्या संपर्कात आलेल्या पत्नी व दोन मुले तसेच मृत्यू झालेले काका यांची करोना तपासणी करण्यात आली होती. त्यांची पत्नी व दोन मुलांचा अहवाल निगेटिव्ह आला होता; मात्र काकांना त्रास होऊ लागल्याने उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. त्यामुळे या काकांना झालेल्या संसर्गाचा आरोग्य विभाग मागोवा घेत आहे. त्यांना जास्त त्रास होऊ लागल्यामुळे त्यांना औंध येथे पाठविण्यात आले असता तेथे त्यांचा मृत्यू आला.
दरम्यान त्यांच्या घरातील पाच जणांना क्वारंटाइन करण्यात आले असून, त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आले आहेत. त्याचा अहवाल प्रलंबित आहे. तालुक्यातील रुग्णांची संख्या गेल्या आठवड्यात झपाट्याने वाढल्यामुळे नागरिकांनी मास्कशिवाय फिरू नये तसेच सोशल डिस्टनसिंगचे भान ठेवावे, असे आवाहन आरोग्य खात्याने केले आहे.