शिरूर -काठापूर खुर्द (ता. शिरूर) येथे विट्ठल रखुमाई कृषी सेवा केंद्र येथे सत्यम ऍग्रो इंडस्ट्रीज, नाशिक कंपनीच्या बंदी असलेल्या खतांचे उत्पादन व विक्री केल्याने शिरूर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हे दाखल केले आहेत.
रुपेश रामदास दिघे (रा. काठापूर खुर्द, ता. शिरूर) व कंपनीचे संचालक चिंतामणी (रा. नाशिक शहर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत कृषी उपविभागाचे खते निरीक्षक तथा जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक रविशंकर सिद्धेश्वर कांबळे यांनी फिर्याद दिली आहे.
काठापूर खुर्द येथे विठ्ठल-रखुमाई कृषी सेवा केंद्रात उत्पादनास व विक्रीस बंदी असलेले नॅचरल पोटॅश खताची विक्री बेकायदेशीर सुरू असल्याची माहिती (दि.22) कृषी विभागाचे विभागीय गुणवत्ता नियंत्रक निरीक्षक संदीप तांबे यांना गोपनीय बातमी मिळाली. त्यांनी विभागीय कृषी सहसंचालक पुणे दिलीप झेंडे, तंत्र अधिकारी गुणवत्ता नियंत्रण (पुणे) लक्षमण होटकर यांना ही माहिती कळविली.
वरिष्ठ अधिकारी यांनी भरारी पथकासह जाऊन तांबे यांच्यासह खते नियंत्रक रविशंकर कावळे यांनी विठ्ठल रुक्माई कृषी सेवा केंद्रावर छापा टाकून तपासणी केली. यावेळी रुपेश रामदास दिघे व त्यांचे वडील रामदास बन्सी दिघे, असे दोघेजण दुकानात होते. दुकानाच्या गोदाममध्ये नॅचरल पोटॅश नावाचे खत विक्रीसाठी आढळून आले. याबाबत विक्री केंद्राचे मालक यांच्याकडे बिलाची मागणी केली असता त्यांनी कंपनीने बिले दिले नसल्याचे सांगितले.
छाप्यात 60 हजार 60 रुपये किमतीचे प्रत्येकी 50 किलोच्या गोणी आढळून आल्या. याप्रकरणी शिरूर पोलीस स्टेशन येथे कंपनीचे संचालक व कृषी सेवा केंद्राचे मालक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार बाबासाहेब जगदाळे करीत आहे.