मुंबई – देशात एप्रिल महिन्यामध्ये 20 आयुर्वेदिक आणि होमिओपॅथिक कंपन्यांनी करोना व्हायरसवरील औषध उपलब्ध असल्याची जाहिरात केली असल्याचे जाहिरात नियंत्रकांना आढळून आले आहे.
ऍडव्हर्टायझिंग स्टॅंडर्ड कौन्सिल ऑफ इंडियाने या संदर्भातील तपशील जमा करून तो केंद्र सरकारकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवून दिला आहे. औषधाची योग्य शहानिशा न करता अशा प्रकारची औषध विक्री करणे किंवा त्याबाबत जाहिरात करणे अयोग्य असल्याचे या संस्थेने म्हटले आहे.
आयुष मंत्रालयाने या प्रकारांची गंभीर दखल घेऊन यासंदर्भात माहिती जमा करण्याचे काम सुरू केले आहे. त्या आधारावर पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे. जोपर्यंत औषधाची खात्रीलायक चाचणी होत नाही, तोपर्यंत अशा प्रकारच्या जाहिराती आणि विक्री करू नये, असे अगोदरच स्पष्ट करण्यात आले आहे.
गेल्या आठवड्यात बाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेद कंपनीने करोना व्हायरसवर औषध उपलब्ध असल्याचा दावा केला होता व जाहिरातही केली होती.त्यानंतर आयुष मंत्रालयाने याची दखल घेऊन पतंजली आयुर्वेदला यासंदर्भात तपशिलात माहिती उपलब्ध करण्यास सांगितले आहे. जोपर्यंत मंत्रालयाकडून परवानगी मिळत नाही तोपर्यंत या औषधाची जाहिरात आणि विक्री करू नये असे सांगण्यात आले आहे.