भोपाळ- भाजपच्या भोपाळमधील खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांना आज पक्षाच्या कार्यालयात आयोजित एका कार्यक्रमाच्यावेळी भोवळ आली. भारतीय जनसंघाचे संस्थापक शामाप्रसाद मुखर्जी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी आयोजित कार्यक्रमाला त्या आल्या होत्या. पक्षाच्या राज्य मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि भाजपाचे अन्य ज्येष्ठ नेते मुखर्जी यांना श्रद्धांजली अर्पण करीत असताना ही घटना घडली.
प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. त्यांना मोठ्या प्रमाणावर औषधे दिली जात आहेत. त्या औषधांच्या परिणामामुळे त्यांना चक्कर आली असावी, असे भोपाळचे माजी खासदार आलोक संजर यांनी वृत्तसंस्थेला सांगितले. भोवळ आल्यानंतर प्रज्ञा सिंह ठाकूर यांना त्यांच्या निवासस्थानी नेण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, असेही त्यांनी सांगितले.
कॉंग्रेस सरकारच्या काळात झालेल्या छळामुळे आपली प्रकृती ढासळली. दृष्टीही कमकुवत झाली असल्याचे प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी रविवारी सांगितले होते. तब्बल 9 वर्षे झालेल्या छळामुळे झालेल्या अनेक इजा पुन्हा उफाळून येत आहेत. डोळ्याला आणि मेंदूमध्ये पाणी व्हायला लागले आहे. त्यामुळे आपली डाव्या डोळ्याची दृष्टी कमकुवत व्हायला लागली असल्याचेही त्या म्हणाल्या होत्या.