- मावळात मृतांची संख्या दोनवर
- आतापर्यंत एकूण 45 रुग्ण बाधित
लोणावळा – लोणावळा शहरालगत असलेल्या ओळकाईवाडी, कुसगाव बुद्रुक येथील करोना बाधित डॉक्टरचा बुधवारी (दि. 17) सकाळी मृत्यू झाला आहे. संबंधित डॉक्टरला करोनाची लागण झाल्याचे 14 जून रोजी समोर आले होते. त्यानंतर कुसगाव बुद्रुक ग्रामपंचायत हद्दीमधील प्रभाग क्रमांक 3 मध्ये प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करण्यात आला आहे.
प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित 50 वर्षीय डॉक्टर पाच जून रोजी आजारी असल्या कारणाने पुण्यातील मंगेशकर रुग्णालयात दाखल झाले होते. मात्र त्यांच्यात करोनाची लक्षण दिसून आल्याने 12 जून रोजी त्यांचे स्वॅब नमुने करोनाच्या चाचणीसाठी घेण्यात आले होते. त्या चाचणीचा अहवाल रविवारी (दि. 14) सायंकाळी प्राप्त होऊन ते करोना बाधित असल्याच निदान झाले होते. त्यानंतर त्यांच्यावर मंगेशकर रुग्णालयातच उपचार सुरू होते, मात्र अखेर बुधवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मावळली आहे.
मावळ तालुक्यात करोनामुळे मृत झालेली ही दुसरी व्यक्ती असून, मंगळवारी दुपारी लोणावळा शहरातील एका महिलेचा करोनामुळे मृत्यू झाला होता. मावळ तालुक्यात आतापर्यंत एकूण 45 रुग्ण करोना बाधित आढळून आले आहेत. त्यात ग्रामीण भागातील 29, तर शहरी भागातील 16 रुग्णांचा समावेश आहे. यातील आतापर्यंत 17 रुग्णांना बरे झाल्याने घरी सोडण्यात आले. 26 रुग्ण अद्यापी रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर दोघांचा मृत्यू झाला आहे.
करोनामुळे लोणावळा शहरातील एका महिलेचा मृत्यू
लोणावळ्यात वलवण विभागातील एक 56 वर्षीय महिलेचा करोनाची लागण झाल्याने मंगळवारी हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. या महिलेच्या संपर्कात असलेल्या तीन जणांचे स्वॅब करोना चाचणीसाठी पाठविण्यात आले आहे, मात्र या तीनही जणांना कोणत्याही प्रकारची लक्षण अद्याप पर्यंत दिसून आलेली नाही. या महिलेवर कॅन्सर या रोगाचे उपचार सुरू होते. ही महिला 1 जून रोजी दुबई येथून विमानाद्वारे गोवा येथे आली, त्यानंतर गोवा येथून वैयक्तिक वाहनाने त्या 2 जूनला लोणावळ्यातील त्यांच्या स्वतःच्या घरी आल्या. त्यानंतर 12 जूनपर्यंत त्या स्वतःच्याच घरी होम क्वारंटाईन होत्या. मात्र 12 जूनला रात्री या महिलेला श्वास घेण्यास त्रास जाणवू लागल्याने 13 जून पहाटे वायसीएम रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर घेण्यात आलेली त्यांची करोना चाचणी “पॉझिटिव्ह’ आली. त्यातच मंगळवारी (दि. 16) दुपारी सव्वा एक वाजता या महिलेचा रुग्णालयातच मृत्यू झाला.