मुंबई – करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी वैद्यकीय कर्मचारी जीवाची बाजी लावत आहे. त्यांच्यासोबत इतर अत्यावश्यक सेवेत काम करणारेही मेहनत घेत आहेत. खेड्यापाड्यात आशा गटप्रवर्तक आणि अर्धवेळ स्त्री परिचर या देखील जीव धोक्यात घालून काम करत आहेत.
मात्र, त्यांना हवा तसा मोबदला दिला जात नसल्याचे बोलले जात होते. मात्र, त्यांच्या कामाची दखल घेऊन करोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावांमध्ये काम करणाऱ्या आरोग्य विभागाच्या आशा गटप्रवर्तक तसेच अर्धवेळ स्त्री परिचर यांना प्रत्येकी एक हजार रुपये इतकी प्रोत्साहनपर रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात राज्य सरकारने घेतला आहे.