वाघोली (प्रतिनिधी): राज्यात कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या कोविड-१९ या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध व नियंत्रण करण्यासाठी महाराष्ट्र कोविड-१९ उपाययोजना नियम-२०२० अमलात आलेले आहेत. महाराष्ट्र कोविड-१९ उपाययोजना २०२० अन्वये कोविड-१९ च्या प्रसारास हवेली तालुक्यातील ग्रामीण क्षेत्रात प्रतिबंध करण्यासाठी उपाययोजना राबविण्यात येत आहेत.
हवेली तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोणा या विषाणूमुळे वाढत असलेल्या संसर्गामुळे रुग्णसंख्या ही पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका लगत असणाऱ्या गावांमध्ये वाढत असून त्यावर उपाययोजना करण्यासाठी हवेली तालुक्यातील सर्व शासकीय यंत्रणा, उपविभागीय पोलीस अधिकारी हवेली, तहसिलदार हवेली, गटविकास अधिकारी पंचायत समिती हवेली. तालुका वैद्यकिय अधिकारी हवेली व पोलीस निरिक्षक यांची आज आढावा बैठक घेण्यात आली.
सदर बैठकीमध्ये सर्वानुमते पिंपरी चिंचवड महानगरपालिका व पुणे महानगरपालिका चे कार्यक्षेत्रालगत ज्या गावांमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत आहे. त्या गावामधील नागरिकांच्या हालचालीवरती व त्या गावातील पिंपरी चिंचवड व पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्रात शासकीय कार्यालये अथवा खाजगी कंपन्यांमधील कामानिमित्त तसेच व्यावसायाकरिता ये-जा करत असणाऱ्या कर्मचारी यांचेवरती काही प्रमाणात बंधणे घालण्याचे ठरले आहे.
गावांमधील लोक, पोलीस अधिकारी व कर्मचारी, आरोग्य सेवेतील कर्मचारी, नर्स, डॉक्टर्स, औषधी कंपन्यांमध्ये काम करणारे कर्मचारी हे कामासाठी सद्यस्थितीत गावाबाहेर ये-जा करत आहेत. त्यामुळे कोरोना विषाणू संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मांजरी, कदमवाकवस्ती, वाघोली मधील नागरिकांना पुणे व पिंपरी चिंचवड महानरपालिका हद्दीत १२ जून पर्यंत बंधने असतील. किंवा त्यांना कामाच्या ठिकाणी राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.