पिंपरी (प्रतिनिधी) -देशभरातल्या कष्टकरी कामगारांची अवस्था दयनीय असून त्यांना लॉकडाउन काळातील वेतन मिळाले पाहिजे. त्यांना इच्छित स्थळी जाण्याची सुविधा दिली पाहिजे आणि इच्छित स्थळी पोहचेपर्यंत मोफत प्रवास व त्यांना अन्नाची, पाण्याची सुविधा द्यावी. त्याचबरोबर वैद्यकीय तपासण्या मोफत कराव्यात. सर्व स्थलांतरित कामगारांचे प्रश्न सोडवावेत, याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करावे असे आवाहन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी आज भोसरी येथे केले.
मेधा पाटकर यांनी आज पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी, चिंचवड सह इतर ठिकाणी परप्रांतीय कामगार वस्ती, कंपनी कामगार अशा कामगारांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी कष्टकरी संघर्ष महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते, नागरी हक्क सुरक्षा समितीचे अध्यक्ष मानव कांबळे, सामाजिक कार्यकर्ते गिरीश वाघमारे, इब्राहिम खान ,महिला विभागाच्या माधुरी जलमूलवार, वंदना थोरात, सचिन नागणे, राजेश माने सुनिता पोतदार, शब्बीर शेख आदी उपस्थित होते.
यावेळी मेधा पाटकर यांनी कामगारांना मिळत असणाऱ्या रेशनबाबत चिंता व्यक्त केली. सध्याच्या स्थितीमध्ये रेशनिंगच्या बाबतीतल्या अडचणी दूर करून तीन महिन्यापर्यंत मोफत रेशन देण्याची सुविधा करणे गरजेचे आहे, अशी मागणीही केली. तसेच रेशन दुकानांना भेट देऊन त्यांचेकड़े आलेला साठा व वितरण बाबत माहिती घेऊन त्यांना काही सूचना केल्या. त्याचबरोबर कम्युनिटी किचन (भोजन सुविधा) प्रशासनाकडून बंद केल्यामुळे अनेक लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. पुढील महिनाभर त्यांना जेवणाची सुविधा चालू ठेवावी, असे आवाहन केले. यावेळी राज्यासह परराज्यातील कामगारांनीही आपल्या समस्या मेधाताई पाटकर यांच्यासमोर मांडल्या त्यांनी त्याची नोंद करत त्यावर लवकरच कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.