– प्रमोल कुसेकर
मांडवगण फराटा : शिरूर तालुक्याच्या पुर्व भागातील मांडवगण फराटा येथे आठ दिवसांपूर्वी दिल्ली येथून आलेल्या एका 24 वर्षीय तरुणाचा अहवाल करोना पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी राजेंद्र शिंदे,मांडवगण फराटा आरोग्य केंद्राच्या डाॕ.मंजुषा सातपुते-इसवे यांनी दिली. मांडवगण फराटा हे या परिसरातील मोठी बाजारपेठ असलेले गाव असल्याने या भागात खळबळ उडाली असून नागरिक भयभीत झाले आहेत.
मांडवगण फराटा येथे 19 मे रोजी दिल्ली येथे युपीएससीचा अभ्यास करणारा एक तरुण त्याच्या घरी आला होता. मांडवगण फराटा येथे या तरुणाला प्राथमिक रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डाॕ.मंजुषा सातपुते-इसवे व सरपंच शिवाजी कदम यांनी होम क्वारंटाइन केले होते.सदर तरुण हा दिल्ली येथून ट्रेनमध्ये प्रवास करत घरी आला होता.
ट्रेनमध्ये सोबत प्रवास करत असलेल्या कोल्हापुर येथिल त्याच्या मिञाचा रिपोर्ट पाॕझिटीव्ह आल्याने सदर तरुणाची करोना टेस्ट घेण्यात आली. सदर तरुणाला ताप व थोडा घसा दुखत असल्याने नोबेल हाॕस्पिटलला पाठविले होते त्यात त्याची टेस्ट केल्यानंतर करोना संसर्गाची लक्षणे दिसून आली आहे. त्या ठिकाणी तपासणी केल्यानंतर त्याचा अहवाल करोना पॉझिटिव्ह आला.सदर तरुणाला पुढील उपचारासाठी दिनानाथ मंगेशकर हाॕस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आले आहे.
मांडवगण फराटा गावामध्ये कोरोना संक्रमित संशयात्मक रुग्ण आढळल्याने दिनांक २७ रोजी पासून संपूर्ण गाव बंद राहणार आहे. तरी सर्व नागरिकांनी, दुकानदारांनी, व्यवसायधारकांनी याची नोंद घ्यावी. असे आवाहन ग्रामपंचायत मांडवगण फराटाचे सरपंच शिवाजी कदम यांनी केले आहे.