राहाता -शहरातील मुख्य चौकात असलेल्या आनंद कॉलिटी किराणा मालाचे दुकान शुक्रवारी पहाटे पाचच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत सुमारे 30 ते 35 लाख रुपयांचे नुकसान झाले. ही आग नेमकी कोणत्या कारणाने लागली. याचे कारण अद्याप मात्र स्पष्ट झाले नाही. राहाता शहरातील चितळी रस्त्यावर भरचौकात गजबजलेल्या ठिकाणी असलेले नरेंद्र मुनावत त्यांच्या मालकीचे आनंद कॉलिटी किराणा दुकानाला पहाटे पाचच्या सुमारास आग लागल्याचे शेजारील नागरिकांच्या लक्षात आले. आगीच्या भक्ष्यस्थानी किराणा दुकान सापडल्याने या दुकानातील सुमारे 30 ते 35 लाख रुपये किमतीचा किराणा मालासह इतर साहित्य जळून भस्मसात झाले.
किशोर सोळंके यांच्या ही आग लागल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तातडीने देवेंद्र मनावत यांच्याशी संपर्क साधाला. दरम्यान, योगेश पाथकर यांनी कुठल्याही प्रकारचे वाट न बघता घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन हाकेच्या अंतरावर असलेल्या अग्निशमनकडे धाव घेऊन अग्निशामक घेऊन आले. आग विझविण्यासाठी राहाता व शिर्डी नगरपंचायतचे दोन अग्निशमन बंब दाखल झाले. आगीचे वृत्त समजताच घटनास्थळी देवेंद्र मुनावत, नरेंद्र मुनावत, माधव मुनावत तसेच जैन युवक मंडळाच्या सर्व सदस्यांनी धाव घेऊन आग विझविण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले.
भाजपचे नेते डॉ. राजेंद्र पिपाडा यांनीही घटनास्थळी भेट दिली. गुरुवारी सायंकाळी आलेल्या पावसामुळे दुकानातील वायरिंगमध्ये बिघाड होऊन शॉर्टसर्किटने आग लागल्याची चर्चा याठिकाणी बोलली जात होती. पहाटेच्या सुमारास आग लागल्याने सर्वजण साखरझोपेत होते. अग्निशमनवेळीच दाखल झाल्याने आग आटोक्यात आल्याने मोठा अनर्थ टळला.