नांदेड : २२ कोरोनाबाधितांना घरी सोडण्यात आल्यानंतर नांदेडकरांना काहीसा दिलासा मिळाला असताना शनिवारी एकाचवेळी १८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. गुरुवारी रात्रीपर्यंत म्हणजे ३६ तासांपासून ३०४ जणांचे अहवाल प्रलंबित असल्याने त्यापैकी अनेकजण कोरोनाबाधित असू शकतात अशी भीती व्यक्त करण्यात येत असताना शनिवारी १८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने ही भीती खरी ठरली आणि संपूर्ण नांदेड जिल्हा पुन्हा हादरून गेला .विशेष म्हणजे ३०४ पैकी फक्त ४१ अहवाल मिळाले ,त्यात अठरा रुग्ण कोरोनाबाधित असल्याचे समोर आले.
यामध्ये मागे मृत्यू पावलेल्या करबला येथील कोरोनाबाधिताच्या निकटवर्तीयातील चौघांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.दरम्यान सराफा परिसरातील कुंभारगल्ली येथे एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने या भागातही कोरोनाने पाऊल ठेवल्याचे दिसून येते.यामुळे सराफा भागातील लोकांची चिंता वाढली आहे.
१३ कोरोनाबाधित हे प्रवासी असल्याचे सांगण्यात आले असून ते कुठून आले,कुठले प्रवासी आहेत याची माहिती प्रशासनाने प्रेसनोटमध्ये दिली नाही.एकीकडे बाजारपेठ सुरू करता येईल का याची चाचपणी प्रशासनाकडून केली जात असताना आज १८ नवे रुग्ण सापडल्याने नांदेडवर चिंतेचे ढग जमा झाले आहे.