नीरा -सातारा जिल्ह्यातील लोक मोठ्या संख्येने पुणे जिल्ह्यातील नीरा येथील वाइन शॉप व देशी गुत्यावर जिल्हा बंदीचा आदेश मोडून येत आहेत. यातील बरेच लोक केवळ मद्य खरेदीसाठी येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्हा बंदी आदेश डावलून अवैध व बेकायदेशीर पद्धतीने मद्य बाळगल्याप्रकरणी रविवारी (दि. 10) नीरा पोलिसांनी धडक कारवाई करत 9 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल व सातारा जिल्ह्यातील दोन व्यक्तींना ताब्यात घेतले आहे.
उमेश संजय खोमणे (रा. साखरवाडी, ता. फलटण), करण विठ्ठल बोडरे (रा. पिंपळवाडी, ता. फलटण) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. नीरा दूरक्षेत्राचे फौजदार विजय वाघमारे, हवालदार राजेंद्र भापकर, कॉन्स्टेबल प्रवीण शेंडे, पोलीस पाटील राजेंद्र भास्कर हे गस्त घालत असताना नीरा नदीच्या काठावरील पालखी तळावर काही लोक संशयित हालचाली करताना आढळले.
या व्यक्तींनी पलायन करण्याचा प्रयत्न केला; पण पोलिसांनी दुचाकीवरून पाठलाग करत त्यांना ताब्यात घेतले. नीरा येथील मद्याच्या दुकानातून जादा प्रमाणात मद्याच्या बाटल्या दिल्याचे निदर्शनास आले आहे. मद्याचा परवाना किंवा ही व्यक्ती कुठल्या जिल्ह्यातील आहे, हे न पाहता सर्रास मद्य विक्री सुरू आहे. ताब्यात घेतलेल्या दोघांकडे देशी मद्याच्या 180 मिलीच्या 153 व विदेशी मद्याच्या 180 मिलीच्या 12 सिलबंद बाटल्या आढळून आल्या.