पुणे – शहरातील करोनाबाधित रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर काही भागांत आणखी व्यवसाय सुरू करण्यास महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी मंगळवारी परवानगी दिली. यात प्रामुख्याने बांधकाम साहित्य, इस्त्री, वैद्यकीय साहित्य तयार करण्याचा कच्चा माल, फर्निचर आणि गृहपयोगी साहित्य विक्रीच्या दुकानाचा समावेश आहे. ही दुकानेही सकाळी 7 ते सायंकाळी 7 या वेळेत सुरू राहणार असून या ठिकाणी व्यावसायिकांना ग्राहक आणि कामगारांच्या दृष्टीने सर्व सुरक्षा उपाययोजना करणे बंधनकारक असणार आहे.
व्यवसायधारक आणि व्यवसायात काम करणारे कर्मचारी हे प्रतिबंधित क्षेत्राच्या बाहेरील भागात राहणारे असणे आवश्यक आहे. दुकानदारांनी कामगारांना फोटोसह ओळखपत्र द्यावे. दुकानामध्ये काम करताना दोन कर्मचाऱ्यांमध्ये सुरक्षित अंतर ठेवावे. दुकानात काम करणाऱ्या सर्व व्यक्तींनी मास्क आणि हातमोजे वापरावे. दुकानात काम करण्याऱ्या कर्मचाऱ्यांना कोणतीही आजाराची लक्षणे दिसल्यास तत्काळ मनपा दवाखान्यात वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला घेऊन त्याप्रमाणे पुढील कार्यवाही करावी. कर्मचाऱ्यांना हात वेळोवेळी स्वच्छ धुण्यासाठी साबण/सॅनिटायझरची व्यवस्था करावी. दुकानामध्ये शिरताना पायऱ्या आणि बाहेरील भाग 1 टक्के सोडियम हायपोक्लोराइट द्रावणाने फवारणी करून घ्यावी, आदि निकष घालण्यात आले आहेत.
या दुकानांना परवानगी
बांधकाम साहित्य, इस्त्री, फर्निचर, गृहपयोगी साहित्य