पाथर्डी -मुंबई येथून परभणीकडे बेकायदेशीरपणे सुमारे 48 मजूर घेऊन जाणारा टेम्पो तालुक्यातील खरवंडी शिवारात पलटी होऊन सुमारे 21 कामगार जखमी झाल्याची घटना घडली. यातील नऊ जण गंभीर जखमी असून त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
मुंबई येथे मोलमजूरी करणारे कामगार करोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू झाल्यानंतर बेरोजगार झाले होते. काम नसल्यामुळे व पैशाच्या अडचणीमुळे या मजुरांनी परभणी जिल्ह्यातील आपापल्या मूळगावी जाण्याचा निर्णय घेतला. सर्वांनी एकत्रित येऊन टेम्पो क्रमांक एम एच 04 एच डी 8038 या गाडीने जाण्याचा निर्णय घेतला.
टेम्पो सोमवार (दि.11) रात्री साडेनऊच्या सुमारास मजुराच्या परिवारासह सुमारे 48 लोक घेऊन अहमदनगरमार्गे परभणीच्या दिशेने निघाला. संतोष कुमार लाल बहाद्दूर यादव (रा. मानखुर, मुंबई) हा टेम्पो चालक गाडी भरधाव वेगाने टेम्पो चालवत असतांना पाथर्डी ते खरवंडी रोडवर हॉटेल रामलखन समोर भरदाव टेम्पो पलटी झाला. या घटनेत सुमारे 21 लोक जखमी झाले आहेत. घटनेनंतर परिसरातील लोकांनी मदतीसाठी धाव घेतली.
जखमींना पाथर्डी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. पाथर्डी पोलिसांना माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी आपल्या कर्मचाऱ्यासह घटनास्थळी दाखल झाले. यातील नऊ गंभीर जखमींना अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेबाबत गणपत चिमणाजी मेटकर (रा. माटेगाव. ता पूर्णा, जि.परभणी) यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी टेम्पो चालक संतोष कुमार लालबहाद्दूर यादव व मालक चंदू राजाराम मांजरे या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक सागर पाटील, शेवगाव पोलीस उपविभागीय अधिकारी मंदार जवळे यांनी रुग्णालयात दाखल होत जखमींची माहिती घेत घटनास्थळी भेट दिली. टेम्पोतील इतर कामगारांना प्रशासनाने निवारागृहात हलवले आहे.