पाथर्डी -तालुक्यातील एका तांड्यावरील शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना उघड झाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, त्याला न्यायालयात हजर केले असता, त्यास 10 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
याबाबत पीडित मुलीने पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील एका तांड्यावरील मुलगी शेळ्या चारण्यासाठी जात होती. आरोपीही शेळ्या चारण्यासाठी जात होता. तक्रार दाखल करण्याच्या वीस दिवसांपूर्वी व दहा दिवसांपूर्वी अशा दोन वेळा संशयित आरोपीने अल्पवयीन मुलीवर जबरदस्ती अत्याचार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. संशयित आरोपीने जीवे मारण्याची धमकी दिल्याने अल्पवयीन मुलीने घरच्यांपासून ही गोष्ट लपवली.
पीडित मुलगी 2 मे रोजी शेतात शेळ्या चारण्यासाठी गेली असता, दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास संशयित आरोपीने पुन्हा अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र मुलीने आरडाओरडा केल्याने शेतात काम करणाऱ्या मजुरांनी धाव घेऊन मुलीची सुटका केली. पीडित अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी संशयित आरोपी शाहरुख बेग (वय 19, रा. बेग वस्ती, माणिकदौंडी) याच्याविरोधात भादंवी कलम 376, 354 व बाललैंगिक अत्याचार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पुढील तपास पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी करत आहेत.