चंडिगढ – हरियाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौताला यांनी बुधवारी स्वत:ची करोनाविषयक चाचणी करून घेतली. जनतेच्या मनातील भीती दूर करण्यासाठी त्यांनी ते पाऊल उचलले.
संपूर्ण जगाप्रमाणेच भारतालाही करोना संकटाशी लढावे लागत आहे. हरियाणासारखे छोटे राज्यही त्याला अपवाद ठरलेले नाही. त्या राज्यात 300 हून अधिक करोनाबाधित आढळले आहेत. त्या संकटाच्या पार्श्वभूमीवर करोनाच्या चाचणीविषयी जनतेच्या मनात भयगंड निर्माण झाला आहे. त्यामुळे जनजागृतीच्या उद्देशातून चौताला चाचणीला सामोरे गेले. करोना संसर्गाची कुठलीही लक्षणे नसताना त्यांनी चाचणी करून घेतली. कुणावर चाचणीला सामोरे जाण्याची वेळ आलीच तर त्यात घाबरण्यासारखे काही नाही, असा संदेश चौताला यांनी त्यांच्या कृतीतून दिला.
चौताला हे जननायक जनता पक्षाचे नेतृत्व करतात. त्यांचा पक्ष हरियाणातील भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये सहभागी झाला आहे. सत्तावाटपाच्या सुत्रानुसार चौताला यांना उपमुख्यमंत्री बनवण्यात आले. ते माजी उपपंतप्रधान दिवंगत चौधरी देवीलाल यांचे पणतू आहेत. दरम्यान, चौताला यांच्या चाचणीचा अहवाल अद्याप यायचा आहे.