डहाणू – डहाणू तालुक्यातील कासा उपजिल्हा रुग्णालय येथील दोन डॉक्टरांना करोनाची लागण झाल्यानंतर प्रशासनाने रुग्णालय तत्काळ सील केले, मात्र या रुग्णालयातून 24 करोना संशयित रुग्णांनी पलायन केल्याचे उघड झाले आहे. खबरदारी उपाय म्हणून त्या डॉक्टरांच्या सहवासात आलेल्या अन्य डॉक्टर, नर्सेस, इतर कर्मचारी तसेच उपचारासाठी दाखल रुग्ण यांच्यासह रुग्णांचे नातेवाईक अशा एकूण 187 जणांना उपजिल्हा रुग्णालय कासा या ठिकाणी क्वारंटाईन करण्यात आले होते.
यामध्ये रुग्णालयातील 22 नवजात बालकांसह 57 रुग्ण, रुग्णांचे 72 नातेवाईक तसेच 58 रुग्णालय कर्मचारी यांचा समावेश होता. 16 आणि 17 एप्रिलला या सर्वांचे स्वॅबचे नमुने चाचणीसाठी पाठविण्यात आले होते. एकूण 187 संशयितांपैकी 9 कंत्राटी कर्मचारी, 10 रुग्णांचे नातेवाईक व 5 रुग्ण असे एकूण 24 करोना संशयित पळून गेल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने कासा पोलिसांना दिली होती. हे सर्व रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत पळून गेल्याचे समजते.
पोलीस प्रशासन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिवस-रात्र मेहनत घेत असताना अशा प्रकारे संशयितांचे पळून जाणे ही चिंता वाढवणारी गोष्ट आहे. उपजिल्हा रुग्णालयातून 24 संशयित रुग्ण पळून गेल्यामुळे कासा परिसरात भीतीचे वातावरण आहे. दरम्यान, हे रुग्णालय सील करण्यात आलेले असताना हा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.