ओतूर -येथील ग्रामपंचायत क्षेत्रातील वॉर्ड क्रमांक 3 मधील शिवाजी रोड (52 गल्ली) येथे सरकारमान्य रेशनींग दुकान अनेक लाभार्थींनी केलेल्या तक्रारींनंतर जुन्नरच्या महसूल विभागाकडून सील केल्याची माहिती महसूल विभागाचे पुरवठा निरीक्षक रवींद्र दळवी यांनी दिली. दरम्यान, आळे येथील रेशनिंग दुकान सील करण्यात आली आहे.
रेशनिंग दुकानदार विजय वसंत कर्डिले यांच्या रेशन दुकानातून लाभार्थ्यांना प्रमाणापेक्षा अत्यल्प धान्य पुरवठा करण्यात येत असल्याच्या अनेक दिवसांपासून तक्रारी येत होत्या. महात्मा गांधी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष तान्हाजी विठ्ठल तांबे यांनी यासंदर्भात जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे तक्रारी दिल्यानंतर वरिष्ठांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.
कारवाईचा अहवाल जुन्नर तहसीलदारांना देण्यात येणार आहे. कर्डिले यांचे रेशर्निग दुकान विविध तक्रारींवरून सील केले आहे. मात्र, उर्वरित लाभार्थ्यांच्या रेशन धान्याचे काय, असा सवाल उपस्थित करण्यात आला. त्यानंतर तहसीलदारांना अहवाल दिल्यानंतर ते पुढील योग्य तो निर्णय घेतील, असे पुरवठा निरीक्षक दळवी यांनी सांगितले आहे.
कारवाईदरम्यान ओतूरचे मंडलाधिकारी डी. एस. लवांडे, कामगार तलाठी राहुल पंदारे, संदीप राऊत, फरहान पिरजादे, तक्रारदार तान्हाजी तांबे उपस्थित होते.
गेल्या 2 ते 3 महिन्यांपासून कर्डिले यांच्या रेशन दुकानासंदर्भात आलेल्या तक्रारींची दखल घेऊन पुरवठा विभागाकडून कर्डिले यांना एकूण धान्य आले किती, वितरण याबाबत शासकीय आकडेवारीसह माहिती घेत होतो. त्यामध्ये फरक जाणवत होता. याबाबत कर्डिले यांनाही सुधारणा करण्याबाबत सांगत होतो.पण त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केल्याने गोरगरीब, सर्वसामान्य जनतेसाठी पुढाकार घेऊन जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे तक्रार दिली. यानंतर जुन्नर पुरवठा विभागाने ही कारवाई केली आहे.
– तान्हाजी तांबे, अध्यक्ष तथा तक्रारदार, तंटामुक्ती समिती.