वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात
वाई – मुंबईतील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या सहकार्याने पाच नेपाळी लोकांना पोलीस गाडीतून पुण्यातून पसरणी, ता. वाई येथे तीन दिवसांपूर्वी आणण्यात आले आहे. संबंधिताने त्यांना घरकामासाठी पसरणीतील आपल्या फार्महाऊसवर आणले आहे. मात्र, पोलीस गाडीचा दुरुपयोग करून पोलिसांकडूनच जिल्हाबंदीचे उल्लंघन होत असेल तर लॉकडाऊनमधील सर्व नियम व प्रशासनाचे आदेश केवळ सर्वसामान्य जनतेलाच लागू आहेत का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
जिल्ह्याबाहेरून आणलेल्या या लोकांची वैद्यकीय तपासणी करण्याचा किंवा त्याची माहिती प्रशासनाला देण्याचा प्रयत्नही संबंधिताने केला नाही. त्यातील दोन जण तंबाखू घेण्यासाठी गुरुवारी दुपारी राजरोस गावात फिरत होतं. काही जागरुक तरुणांनी त्यांच्याकडे विचारणा करून त्यांना ग्रामपंचायतीत आणले. त्यानंतर प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली आणि त्या सर्वांना होम क्वारंटाइन करण्यात आले.
या प्रकरणी वाईच्या तहसीलदारांकडे तक्रार करण्यात आली आहे. आपापल्या गावांचे आरोग्य सांभाळण्यासाठी पोलीस पाटील, ग्रामसेवक, डॉक्टर, आशा स्वयंसेविका, ग्रामपंचायत सदस्य रात्रीचा दिवस करत असताना पोलीसच लॉकडाऊनमधील आदेशांना हरताळ फासत असतील तर त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. या प्रकाराला मुंबईतील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचा पाठिंबा असल्याचे बोलले जात असून जिल्हाबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल संबंधितांवर जिल्हा प्रशासन काय कारवाई करणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.