महाबळेश्वर -करोनामुळे जिल्हा प्रवेशबंदी करण्यात आली असली तरी चोरवाटांनी व छुप्या मार्गाने अजूनही लोक परजिल्ह्यातून महाबळेश्वर तालुक्यात येत आहेत. गेल्या दोन दिवसांत परजिल्ह्यातून आलेल्या 26 जणांना पाचगणी व तळदेव येथे इन्स्टिट्युशन क्वारंटाइन सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. येस बॅंक घोटाळ्यातील संशयित व प्रसिद्ध उद्योगपती वाधवान यांच्या कुटुंबीयांसह 23 जणांना या आधीच इन्स्टिटयुशनल क्वारंटाइन करण्यात आले आहे. त्यामुळे महाबळेश्वर तालुक्यात इन्स्टिट्युशनल क्वारंटाइन करण्यात आलेल्यांची संख्या 49 वर पोहोचली आहे.
महाबळेश्वर तालुक्यातील हजारो लोक रोजगारासाठी मोठ्या शहरांमध्ये रहात आहेत. मात्र, करोनामुळे त्यातील बहुतांश लोकांनी गावचा रस्ता धरला आहे. गेल्या महिनाभरात परजिल्ह्यातून महाबळेश्वर तालुक्यात आलेल्यांची संख्या हजारोंच्या घरात आहे. लॉकडाऊनमुळे जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्या असून जिल्हा प्रवेशबंदीची काटेकोर अंमलबजावणी सुरू आहे. मात्र, पोलिसांची नजर चुकवून आजही लोक महाबळेश्वर तालुक्यात चोरवाटा व छुप्या मार्गांनी येत आहेत.
काही लोक पायी जिल्ह्यात येत असून ते गावात पोहोचतात, तेव्हा स्थानिक लोक प्रशासनाला माहिती देत आहेत. त्यामुळे बाहेरून आलेल्या लोकांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना इन्स्टिट्युशनल क्वारंटाइन केले जात आहे. अशा प्रकारे गेल्या दोन दिवसांत 26 जणांना इन्स्टिट्युशनल क्वारंटाइन करण्यात आल्याची माहिती तहसीलदार सुषमा चौधरी-पाटील यांनी दिली. अशा लोकांची संख्या 49 वर गेली आहे. यापैकी उद्योगपती वाधवान कुटुंबीय व नोकरचाकर मिळून 23 लोकांना पाचगणीत इन्स्टिट्युशनल क्वारंटाइन करण्यात आले आहे. त्याच ठिकाणी गेल्या दोन दिवसांत आणखी दहा लोकांना तर तळदेव येथील हायस्कूलमध्ये 16 लोकांना इन्स्टिट्युशनल क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आले आहे.