पिंपरी भाजीमंडई उद्यापासून तीन दिवस बंद
पिंपरी (प्रतिनिधी) – मोशी, पिंपरी उपबाजार शनिवारपासून (दि. 11) कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आदेशानुसार बंद ठेवण्यात येणार आहे. पुढील आदेश येईपर्यंत हे बाजार बंद राहणार आहेत. त्यामुळे फळे व भाजीपाला यांची विक्री बंद राहील. दरम्यान, पिंपरी भाजी मंडई मात्र शनिवारी (दि.11) पहाटे 3 ते सकाळी 8 या वेळेत खुली राहणार आहे. शनिवारी सायंकाळी 6 पासून मंगळवारपर्यंत (दि. 14) मंडई बंद ठेवण्यात येणार आहे.
मोशी येथील नागेश्वर महाराज उपबाजार समिती आवार चालू ठेवण्यात आले होते. येथे पहाटे 2 ते सकाळी 6 या वेळेत घाऊक स्वरूपातील भाजी विक्री चालू होती. किरकोळ भाजी विक्री मात्र बंद केली होती. करोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता संबंधित ठिकाणी “सोशल डिस्टंसिंग’ ठेवता येत नव्हते. संबंधित उपबाजारात होणारी गर्दी लक्षात घेता करोना संसर्गाचा धोका टाळण्यासाठी शनिवारपासून (दि.11) पुढील आदेश येईपर्यंत फळे व भाजीपाला यांची विक्री बंद ठेवण्यात येणार आहे. त्याशिवाय, पिंपरी उपबाजारातील फळे व भाजीपाला विक्री देखील बंद ठेवण्याचे आदेश आहेत.
पिंपरी मंडई उद्यापासून बंद
पिंपरी येथील भाजीमंडईत होणाऱ्या गर्दीला अटकाव करण्यासाठी सध्या पहाटे 3 ते सकाळी 7 या वेळेत मंडई खुली ठेवण्यात येत आहे. दरम्यान, मंडई पहाटे 5 ते सायंकाळी 6 या वेळेत खुली ठेवण्याबाबत आमदार गौतम चाबुकस्वार यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याशी चर्चा करून तोडगा काढला होता. तथापि, आज सकाळी मंडई सुरू झाल्यानंतर येथे “सोशल डिस्टन्सिंग’ पाळले जात नसल्याचे निदर्शनास आले. पर्यायाने, महापालिकेने पुन्हा मंडई बंद केली. दरम्यान, शनिवारी पहाटे 3 ते सकाळी 8 या वेळेत मंडई खुली राहणार आहे. रविवारपासून बुधवारपर्यंत मंडई बंद ठेवली जाणार आहे.