पिंपरी (प्रतिनिधी) – करोनाच्या काळात नाकाबंदी करणाऱ्या पोलिसांना रिवॉर्ड (बक्षीस) देण्यात येत आहे. मात्र बक्षीस देताना वरिष्ठ पोलीस निरीक्षकासमोर हुजेरीगिरी करणाऱ्यांना झुकते माप देण्यात येत असल्याची कुजबूज पोलीस वर्तुळात सुरू आहे. यामुळे इतर कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये जी साहेब… जी साहेब… करणाऱ्यांचे भले होत असल्याची चर्चा पोलिसांमध्ये सुरु झाली आहे.
संचारबंदीचे काटेकोरपणे पालन व्हावे, यासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांनी शहरातील 12 एन्ट्री पॉइन्टसह 80 ठिकाणी नाकाबंदी लावली आहे. दिवस रात्र सुरू असलेल्या या नाकाबंदीत अनेकांनी चांगली कामगिरी करीत संचारबंदी मोडणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. चांगली कामगिरी करणाऱ्यांना पोलिसांना रिवॉर्ड देण्याची सूचना वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी केली आहे. मात्र रिवॉर्डसाठी नावे पाठविताना काही “विशिष्ट’ जणांना प्राधान्य दिले जात असल्याचे दिसून येते. यामुळे भर उन्हात काम करणाऱ्यांवर अन्याय होत असल्याची भावना पोलिसांमध्ये आहे.
पोलिसांनाही दोन टप्प्यात वेतन?
करोनाला प्रतिबंध घालण्यासाठी पोलिसांची महत्वाची भूमिका आहे. असे असतानाही पोलिसांचा पगार दोन टप्प्यात देण्यात येणार असल्याचे समजते. अधिकाऱ्यांच्या वेतनात 50 टक्के तर कर्मचाऱ्याच्या वेतनात सध्या 25 टक्के कपात होणार आहे. यामुळे पोलिसांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.