चंदिगढ, (पंजाब): लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये पालकांकडे शुल्काची मागणी केल्याबद्दल पंजाबमधील 15 शाळांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री विजय इंदर सिंगला यांनी चंदिगढमध्ये गुरुवारी ही माहिती दिली. आतापर्यंत 38 खासगी शाळांना शुल्काबाबत पालकांकडे तगादा न लावण्याच्या राज्य सरकारच्या सूचनेकडे दुर्लक्ष केल्याबद्दल कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे. तसेच या शाळांना प्रत्युत्तर देण्यासाठी 7 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. शाळांनी लॉकडाऊनचा कालावधी संपेपर्यंत पुढील शैक्षणिक सत्रासाठी विद्यार्थ्यांच्या प्रवासी वाहतुकीचे शुल्क आणि पुस्तकांसाठीचे शुल्कही पालकांकडे मागू नये, असेही शाळांना सांगण्यात आले आहे, असेही सिंगला यांनी सांगितले.
पुढील शैक्षणिक सत्रासाठीच्या प्रवेशांच्या प्रक्रियेचे वेळापत्रक नव्याने आखण्यात यावे, असेही राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्यावतीने सर्व खासगी शाळांना सांगितले आहे. यानुसार लॉकडाऊनचा कालावधी संपल्यानंतर शुल्क भरण्यासाठी 30 दिवसांची वाढीव मुदत देण्याची सूचनाही सर्व शाळांना करण्यात आली आहे.