श्रीनगर, दि.8 -जम्मू-काश्मीरमध्ये बुधवारी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी एका खतरनाक दहशतवाद्याचा खात्मा केला. सजाद नवाब डार असे त्याचे नाव आहे. तो पाकिस्तानस्थित जैश-ए-महंमद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या म्हणून सक्रिय होता.
बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर भागात दहशतवाद्यांचे अस्तित्व असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली.
त्यानंतर दहशतवाद्यांच्या शोधासाठी सुरक्षा जवानांनी मंगळवारी रात्रीपासून विशेष मोहीम हाती घेतली. दहशतवादी दडल्याचा संशय असलेल्या परिसराला जवानांनी वेढले. बुधवारी सकाळी जवानांना पाहून दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. त्याला जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यामुळे दोन्ही बाजूंमध्ये काही काळ चकमक झडली.
त्या चकमकीत सजाद मारला गेला. त्या घटनेचा अधिक तपशील तातडीने मिळू शकला नाही. मात्र, सजादचा खात्मा हे सुरक्षा दलांचे मोठे यश मानले जात आहे. देशाच्या इतर भागांप्रमाणेच जम्मू-काश्मीरलाही करोना संकटाशी लढावे लागत आहे. त्या संकटाचा गैरफायदा घेण्याचे नापाक मनसुबे बाळगणाऱ्या दहशतवाद्यांच्या हालचाली मागील काही दिवसांपासून वाढल्या आहेत. मात्र, सतर्क सुरक्षा दलांमुळे दहशतवाद्यांना हादरे बसत आहेत.