नवी दिल्ली – अमेरिकेकडून भारताला कोरोना विषाणूचा मुकाबला करण्यासाठी 2.9 दशलक्ष डॉलरची मदत केली जाणार आहे. एनिथ जस्टर यांनी ही माहिती दिली. अमेरिकेच्या “युएसएड’ या संस्थेच्या माध्यमातून ही मदत दिली जाणार आहे.
या संस्थेव्यतिरिक्त सेंटर फॉर डिसीज कंट्रोल ऍन्ड प्रिव्हेन्शन आणि करोनाला आटोक्यात आणण्यासाठी भारतात सक्रिय असलेल्या अन्य संबंधित संस्थांच्या माध्यमातून ही मदत दिली जाणार आहे. “युएसएड’ ही जगभरात सक्रिय असलेली अमेरिकेची मदत संस्था आहे.
“कोविड-19′ या रोगाची साथ आटोक्यात आणण्यासाठी सर्वच देशांची सरकारे आणि आंतरराष्ट्रीय संघटना एकमेकांना सहकार्य करत आहेत, असे अमेरिकेच्या दुतावासाने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
आरोग्य सहाय्यासाठी दिल्या जाणाऱ्या 1.4 अब्ज डॉलरची मदत उभारण्यात आली आहे. एकूण 3 अब्ज डॉलरची मदत उभारण्यात आली आहे. भारताला अमेरिकेकडून गेल्या 20 वर्षांपासून ही मदत दिली जात आहे. जागतिक आरोग्य संघटनेकडून भारतात केल्या जाणाऱ्या कामातही “युएसएड’च्या माध्यमातून मदत दिली जात आहे. “कोविड-19’चा फैलाव रोखणे, लागण झालेल्यांची काळजी घेणे आणि कोविड-19 च्या नियंत्रणासाठी स्थानिक गटांना सहकार्य करण्यासाठी हा निधी दिला जाणार आहे.