पिरंगुट -गावातील एका महिलेला करोनाची लागण झाल्याचे शुक्रवारी (दि. 3) समजल्यानंतर पिरंगुटसह संपूर्ण तालुक्यात एकच खळाळ उडाली होती. तर तिच्या संपर्कातील दोघांची टेस्ट निगेटिव्ह आल्याने गावासह तालुक्याला थोडासा दिलासा मिळाला असला तरी नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेणे गरचेजे असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.
मुळशी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अजित कारंजकर म्हणाले की, संबंधित करोना बाधित महिलेचा पती आणि महिलेस उपचारासाठी नेणारी एक व्यक्ती अशा दोघांची करोना टेस्ट निगेटीव्ह निघाली आहे. तसेच त्या महिलेच्या संपर्कात आलेल्यांची माहिती घेण्यात येत असून 15 जणांना क्वारंटाइन केले आहे.
मुळशीचे तहसीलदार अभय चव्हाण म्हणाले की, पिरंगुटमध्ये करोना बाधित महिला पेशंट निष्पन्न झाल्यानंतर संपूर्ण पिरंगुट गाव पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवाही बंद करण्यात आल्या आहेत. पुढील काही दिवस पिरंगुट असेच राहणार आहे. आणि पिरंगुट गावातील प्रत्येक नागरिकांचा सर्व्हे सुरू असून प्रत्येकाच्या आरोग्यावर बारकाईने नजर ठेवणार आहे.
कोणाला ताप आला असेल तर त्याच्याबद्दल दक्षता घेतली जाईल. तसेच कोणाही नागरिकास ताप, खोकला, घशाला इन्फेक्शन असे काही जाणवत असेल तर त्यांनी घाबरून न जाता प्रशासनास कळवावे. त्याला योग्य मार्गदर्शन व लागलीच आरोग्य सेवा देता येईल, असे त्यांनी नमूद केले.