कराड (प्रतिनिधी) – कराड शहरातून मुदतबाह्य हॅण्डवॉश विकल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपअधीक्षक सुरज गुरव यांच्या पथकाने शहरात टाकलेल्या छाप्यामध्ये पोलिसांनी मुदतबाह्य हॅण्डवॉशचा मोठा साठा जप्त केला. रात्री उशीरापर्यंत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.
कराडमध्ये मुदतबाह्य हॅण्डवॉशची विक्री केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार उपअधीक्षक सुरज गुरव यांनी त्यांचे सहकारी पोलीस उपनिरीक्षक एस. डी. शेलार, राजु डांगे, हवालदार प्रवीण पवार, सागर बर्गे, आसिफ जमादार, संतोष चव्हाण, अतुल देशमुख, सुधीर जाधव, सचिन गुरव, सौरभ कांबळे यांच्या पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकला. तेथे मुदतबाह्य हॅण्डवॉश विक्री केली जात असल्याचे निदर्शनास आले.
या छाप्यात जप्त केलेले हॅण्डवॉश २०१३ मध्ये तयार करण्यात आले आहे. त्याची मुदत २०१६ मध्ये संपली आहे. मात्र, त्यावर दुसरा कागद चिटकवून त्याची मुदत वाढवून आणि किंमत बदलून ते हॅण्डवॉश बाजारात पुन्हा विकण्यात आले असल्याची शक्यता आहे. या विक्रेत्याने एका ग्रामपंचायतीसह कोल्हापूर व अन्य ठिकाणी हॅण्डवॉश विकल्याचे तपासात पुढे येत आहे. ज्यांना विकले आहेत त्यांची माहिती घेऊन तो हॅण्डवॉशचा साठा जप्त करण्याची कार्यवाही पोलिसांनी सुरु केली आहे. लोकांनी हॅण्डवॉशची एक्सपायरी डेट चेक करावी, असे आवाहन श्री. गुरव यांनी केले आहे.