फलटण (प्रतिनिधी) – करोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरातच लॉकडाऊन असतानाही फलटण शहरात काहीजण बिनकामाचे फिरत आहेत, रस्त्यावर वाहने फिरवत आहेत, या पार्श्वभूमीवर गावातून मोटरसायकलवर बिनकामाचे फिरणाऱ्या 100 हून अधिक वाहनांवर फलटण शहर पोलिसांनी कारवाई केली. फलटण शहरात करोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणा मोठ्या प्रमाणात कार्यरत झाली आहे, मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तही नेमण्यात आलेला आहे. मात्र काहीजण आरोग्याची काळजी न घेता मोकाटपणे शहरात फिरत आहेत. काहीजण गल्लीत क्रिकेट खेळत आहेत, याबाबतच्या तक्रारी येताच फलटण शहर पोलिसांनी आज शहरातील अनेक भागातून फेरफटका मारला, घराबाहेर पडणाऱ्यांना हटकले तर बिनकामाचे मोटर सायकलवरून फिरणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करत 100 हून अधिक वाहने पोलिसांनी जप्त केली, ती सर्व वाहने नगरपालिकेच्या आवारात लावण्यात आलेली आहेत. यापुढेही बिनकामाचे फिरणाऱ्या वाहन चालक व व्यक्तींवर कडक कारवाई करण्याचा इशारा पोलीस निरीक्षक प्रताप पोमण यांनी दिला आहे.