पॅरिस: जगभरात हाहाकार उडवणाऱ्या कोरोना विषाणूची बाधा झालेल्यांची संख्या 2 लाख 54 हजारांवर पोहचली आहे. त्या विषाणूमुळे होणाऱ्या कोविड-19 आजाराने आतापर्यंत जगभरात 10 हजार 442 बळी घेतले आहेत. दरम्यान, इटलीतील मृतांच्या संख्येने चीनमधील बळींचा आकडाही ओलांडला आहे.
मागील वर्षाच्या अखेरीस चीनमध्ये सर्वप्रथम करोनाचा उद्रेक झाला. त्यानंतर त्या विषाणूचा फैलाव वेगाने 183 देशांमध्ये झाला आहे. चीनमध्ये करोनाने 3 हजार 248 जणांचा बळी घेतला. आता त्या देशातील करोनाचा फैलाव नियंत्रणात आला आहे. मात्र, युरोपमध्ये त्या विषाणूने कहर करण्यास सुरूवात केली आहे. युरोप खंडात आतापर्यंत 5 हजार 168 जण मृत्युमुखी पडले आहेत. त्यामध्ये इटलीतील 3 हजार 405 मृतांचा समावेश आहे.
स्पेनमधील जीवितहानीनेही 1 हजारचा आकडा ओलांडला आहे. फ्रान्समध्ये 372 मृतांची नोंद झाली आहे. इराणमध्येही मोठी हानी झाली आहे. त्या देशात 1 हजार 433 करोनाबाधित दगावले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्लूएचओ) कोरोनाच्या फैलावाला याआधीच जागतिक साथ म्हणून घोषित केले आहे. आता संपूर्ण जग करोनाच्या विरोधात लढा देण्यासाठी सरसावले आहे.